BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित
भव्य स्मारकाच्या कामाची व आराखड्याची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व खासदार शरद
पवार यांनी पाहणी केली.सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, सद्यस्थितीत स्मारकाचे
25 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. भव्य स्मारकाच्या सुधारित संकल्पनेला मंत्रिमंडळाने
नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवून पादपीठ 30 मीटर
(100 फूट) उंच व पुतळा 106.68 मीटर (350 फूट) उंच अशी एकूण 136.68 मीटर (450 फूट) उंची
ठेवण्यास मान्यता देण्यात आली. सुधारित संकल्पनेनुसार प्रकल्पाचा खर्च 763.05 कोटी
रुपयांवरुन सुधारित अंदाजित खर्च 1089.95 कोटी रुपये अपेक्षित आहे. सुधारित संकल्पनेनुसार
स्मारक इमारतीचे नव्याने विस्तृत वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी आराखडे तसेच विविध
विभागांच्या नव्याने घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या इ. कामे प्रगतीपथावर असल्याचेही
श्री.मुंडे यांनी सांगितले.श्री.पवार म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक
जागतिक दर्जाचे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. जगभरातील लोक या स्मारकाला मोठ्या संख्येने
भेट देतील. त्यांना चैत्यभूमी व स्मारकाचा उत्तम संगम पाहावयास मिळेल. स्मारकाचे काम
दोन वर्षात पूर्ण होईल, असेही श्री.पवार यांनी सांगितले.यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री
नवाब मलिक, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार प्रकाश गजभिये, एमएमआरडीएचे
अधिकारी तसेच मे.शापुरजी पालनजी कंपनी प्रा.लि. कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
Post a comment