0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्ल्यूएम) कंपनी लवकरच महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करणार आहे. इलेक्ट्रिक वाहने व बॅटरी निर्मिती करण्यावर ही कंपनी भर देणार असून याद्वारे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली.अमेरिकेतील जनरल मोटर्स व चीनच्या ग्रेट वॉल मोटर्स कंपनीमध्ये प्रकल्प हस्तांतरणाबाबत झालेल्या करारानुसार जीडब्ल्यूएम कंपनी महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करणार आहे. पुण्याच्या तळेगावमध्ये टप्पा क्रमांक १ मध्ये हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.पहिल्या टप्प्यात जीडब्ल्यूएम कंपनी महाराष्ट्रात सुमारे पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असून दोन हजार जणांना रोजगार देणार आहे. हावल इंडिया नावाने ही कंपनी कार निर्मिती करणार आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीची निर्मिती ते करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी निर्मिती करणारी देशातील ही पहिली कंपनी ठरणार आहे. दरम्यान, कंपनीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.ग्रेट वॉल मोटर कंपनी तीस वर्षांपासून चीनमधील आघाडीची कंपनी आहे. ३० वर्षांपासून विविध प्रकारच्या कार निर्मितीत कंपनीची ख्याती आहे. कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिल्याने कंपनीच्या प्रतिनिधीचे उद्योग विभागाच्यावतीने स्वागत करण्यात आले.यावेळी उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते. जीएम कंपनीचे मुख्य अधिकारी थॉमस कुणी, भारतातील मुख्य अधिकारी असिफ खत्री तसेच जीडब्ल्यूएमचे प्रमुख पार्कर शी, भारतीतील प्रकल्प व्यवस्थापक मायकल चाँग आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top