web-ads-yml-750x100

Breaking News

नव्या पिढीला समतेच्या विचारांची, विकासाची दृष्टी आणि यशाची प्रेरणा मिळेल-खासदार शरद पवार

BY – युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
नव्या पिढीला आधुनिकतेचा विचार, समतेचा विचार, लोकशाहीचे महत्त्व समजेल आणि विकासाच्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धतींनी शैक्षणिक भूमिका स्वीकारुन पुढे कसे जायचे, यशस्वी कसे व्हायचे, या प्रेरणा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या माध्यमातून मिळतील, अशी खात्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांचे विचार पुढे नेण्याचे समर्थ काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून केले आहे, असे सांगून त्यांचा समतेचा विचार जगात पोहोचविण्यासाठी देश पातळीवरील मोठा कार्यक्रम करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज झाला. या कार्यक्रमास पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आदी उपस्थित होते.खासदार श्री. पवार म्हणाले, देशात अनेक राजे होऊन गेले. संस्थानेही झाली. समाजाचं स्वत्व गेलं होतं ते स्वत्व जागे करुन समाजाला संघटीत करुन, राज्य प्रस्थापित करण्याची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हातात आलेलं राज्य समाजातील शोषित, पीडित, वंचित घटकांना उभे करण्यासाठी वापरायचे हे सूत्र ठेवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा राज्य कारभार केला. दत्तक विधानानंतर पहिल्या दिवसापासूनच हे राज्य लोकांसाठी चालविण्याचा निर्णय घेतला. प्रशासनात शिस्तीची भूमिका घेतली. अनेक निर्णय घेतले. अधिकार हातात असताना शेवटच्या माणसाविषयी ह्दयात करुणा होती. उपेक्षिताला सामान्य माणसाला लाभ देण्यासाठी 50 टक्के  आरक्षणाचा निर्णय घेतला.
आजची पिढी शिक्षित झाली. जिल्ह्यातील शेती संपन्न झाली. याची दृष्टी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिली. राधानगरीचे धरण बांधून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था, पाण्यापासून वीज निर्मितीचा निर्णय घेतला. शेतीला जोड धंदा उद्योगाचा असावा. निर्माण केलेली वीज अशा कारखानदारीला देण्यासाठी उद्यमनगरीची स्थापना केली. शिक्षण, शेती, शिकार, मल्लविद्या, व्यापार उदीम, उद्योग या सर्वांचा व्यापक विचार करण्याची भूमिका त्यांची होती. कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा क्षेत्रात समाजातील कलावंतांना प्रोत्साहन देवून पुढे आणण्याचं काम त्यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मदत करुन देशाला दिशा देणाऱ्या विचारवंताला त्यांनी पुढे आणले. त्यांनी लिहीलेल्या घटनेची चौकट लोकशाहीसाठी महत्वाची आहे. नव्या पिढीला हे स्मारक समतेचा विचार आणि विकासाची दृष्टी देण्याची प्रेरणा निश्चित देईल, असेही ते शेवटी म्हणाले.
महसूलमंत्री श्री. थोरात यावेळी म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे हे समाधी स्मारक 100 वर्षांपेक्षा जास्त मानवतेला समतेचा संदेश देणार आहे. सर्व सामान्यांची ही गादी  आहे, असे सांगून राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचा कायदा केला. त्याच विचारावर राज्य शासनाने पुढे आणखी 10 वर्षे हे आरक्षण वाढविले आहे. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, समानतेचा संदेश केवळ निर्णय न घेता प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संतांचे विचार पुढे नेण्याचं समर्थ काम राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांचे विचार जगात पोहचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु या.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, शाहू मिल येथील राजर्षी शाहू महाराजांचे स्मारकाचे भूमिपूजन आमच्या हस्ते झाले आहे. हे स्मारक आमच्या हातून पूर्ण करण्याची नियतीची इच्छा असावी. निश्चितपणे त्याची सुरुवात होईल. एकसंघ राहण्याच्या भूमिकेचा पाया राजर्षी शाहू महाराजांचा आहे. त्यांच्यांच विचाराचे कार्य पुढे घेवून आम्ही जात आहोत, असे ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले, मला विधानसभेत पाच वेळा जाता आले, मंत्री होता आले. हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा विजय आहे. ज्या काळात जातीय वादाची बिजे रोवली जात होती, त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी सर्वधर्मीयांची बोर्डींग काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून माणगाव परिषद घेतली. याच समतेच्या विचारांचा जागर करु या, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे कृतीशील अनुयायी तयार व्हायला हवेत. समतेचा विचार घेवून सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठी पुढे गेला, राजर्षी शाहूंचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणला, तरच आजच्या लोकार्पण सोहळ्याचे सार्थ होईल, असेही ते म्हणाले.यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी सर्वांचे स्वागत प्रास्ताविक केले. स्मारकाचे सादरीकरण अभिजीत जाधव कसबेकर आणि इंद्रजीत सावंत यांनी यावेळी केले. महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले.  राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली. 

No comments