0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे, अति प्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करणे यासाठी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
श्री. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पर्यावरण विभागाच्या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली.श्री. ठाकरे म्हणाले, माहुल येथील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम हा फक्त त्या भागापुरता मर्यादित न राहता मुंबईतील इतर भागातही होत आहे. उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे. त्यानुषंगाने माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पूर्तता करतात किंवा नाही याची पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.तसेच तेथील अतिप्रदूषित आणि धोकादायक भागातील घरांचे पुनर्वसन जलद गतीने करण्याच्या अनुषंगाने म्हाडा, मुंबई महापालिका, उद्योग, पर्यावरण इत्यादी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल. या बैठकीचे आयोजन तातडीने करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी श्री. ठाकरे म्हणाले, पर्यावरण रक्षणाचा कार्यक्रम हा फक्त शासकीय यंत्रणांपुरता मर्यादित न राहता ती लोकचळवळ होणे गरजेचे आहे. यासाठी या मोहिमेत जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्याबरोबरच स्वयंसेवी संस्था, तरुण, विद्यार्थी यांचा सहभाग घेण्यावर भर देण्यात यावा, असेही मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण विभागाच्या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने यावेळी सादरीकरण करण्यात आले. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Post a comment

 
Top