0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
कला व संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी अथर्व लोहार तर गणितातील सृजनात्मक कार्यासाठी देवेश भईया या महाराष्ट्रातील दोन बालकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात हे बालक सहभागी होणार आहेत.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020' प्रदान करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री देबाश्री चौधरी आणि सचिव रबिंद्र पंवार यावेळी उपस्थित होते.  पदक, 1 लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या वर्षीपासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने 'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार' सुरु केला. सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, क्रीडा, कला व संस्कृती  क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 49 बालकांना यावेळी 'बाल शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अथर्व लोहार  आणि  देवेश भईया या  महाराष्ट्रातील बालकांनाही यावेळी गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त  सर्व बालकांना यावर्षी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमानही मिळणार आहे.मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आणि  सध्या मुंबईतील अंबरनाथ भागात राहणारा  अथर्व लोहार  या  11 वर्षांच्या बाल तबला वादकाने कला व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लहानपणापासूनच तबल्याची आवड  असणाऱ्या  अथर्वने  या कला प्रकारात  नैपुण्य  मिळविले  व  देशाचे  नावही  उज्ज्वल  केले. थायलंड  आणि बँकॉक येथे पार पडलेल्या जागतिक तबला वादन स्पर्धेत अथर्वने भारताचे प्रतिनिधीत्व केले. स्वरसाधना समिती या नामांकित संस्थेच्या 2018 मध्ये आयोजित 53 व्या वार्षिक शास्त्रीय संगीत व नृत्याच्या स्पर्धेत अर्थवने तबला सोलो वादनात सुवर्णपदक पटकाविले आहे.
जळगाव येथील गणितज्ज्ञ  देवेश भईया  या 13 वर्षाच्या बालकाने गणितात सृजनात्मक योगदान दिले आहे. मुंबई सायन्स टिचर्स  असोशिएशनच्या वतीने आयोजित होमी भाभा ज्युनियर सायंटिस्ट  परीक्षेत  देवेशने सुवर्णपदक पटकाविले आहे. साऊथइस्ट एशियन मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमधे सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी देवेशला  सुवर्णपदक मिळाले आहे. इग्नायटेड माइंडलॅब परीक्षेत  सर्वात जास्त गुण मिळविणारा देवेश हा पहिला भारतीय  ठरला आहे. 

  

Post a Comment

 
Top