Breaking News

समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देणार - धनंजय मुंडे

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या विभागांतर्गत येणाऱ्या समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. श्री.मुंडे पुढे म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत वंचित घटकाला सहाय्य करणे हे आपल्या विभागाचे काम आहे. विविध योजनांचा लाभ वंचित घटकातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे असा उद्देश सर्वांचा असायला पाहिजे. त्याचबरोबर योजनांविषयी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी शासन विभागातील अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.सर्वसामान्यांमध्ये सामाजिक न्याय विभागाबाबतची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे काम यापुढे झाले पाहिजे. भविष्यात इतर विभागांपेक्षा ‘सर्वात सक्रिय विभाग’ (most active department) अशी ओळख निर्माण करण्यासाठी कामामध्ये गती आणावी लागेल. दलाल प्रथेला आळा घालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगून महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभाग नावारुपाला आला पाहिजे. भविष्यात मुख्यमंत्र्यांनाही या विभागाचा हेवा वाटेल अशी विभागाची प्रतिमा तयार करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे, अशी भावना श्री.मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व योजना, महामंडळांच्या कामकाज, रिक्त पदे, दिव्यांग कल्याण, शिष्यवृत्ती, जिल्हा जात वैधता पडताळणी समिती, शासकीय  वसतिगृह, निवासी शाळा, सामाजिक सभागृह, ॲट्रॉसिटी कायदा व गुन्हे सिद्धीचे प्रमाण, रमाई आवास योजना, अर्थसंकल्पीय तरतूद, ज्येष्ठ नागरिक धोरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, अनुसूचित जाती सहकारी संस्थेची कर्ज योजना आदी योजनांविषयी सादरीकरणातून आढावा श्री.मुंडे यांनी यावेळी घेतला.
या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांच्यासह विविध महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments