0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
दिव्यांग व दिव्यांगांच्या समस्या हे विषय दुर्लक्षित होत असल्याने, या विषयाकडे विशेष लक्ष देण्यात येईल. त्यासाठी दिव्यांग विकास विभाग स्वतंत्र करण्याबाबत सकारात्मक असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग विकास विभाग निर्मिती प्रक्रियेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती.मुंडे म्हणाले, दिव्यांग विकास विभागाकरिता एक स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. त्याद्वारे प्रत्येक दिव्यांगाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. या विभागाने कामाच्या व्याप्तीमध्ये वाढ करुन विभागाला प्रतिष्ठा मिळेल असे काम करायला हवे. दिव्यांगांकरिता राज्य शासनामार्फत 5 टक्के निधीचा वापर योग्य रितीने होतो की नाही हे तपासले पाहिजे. विभागातील रिक्त पदांची संख्या, दिव्यांगत्वाचे एकूण प्रकार, एकूण निधी, दिव्यांगांसाठी विविध योजना याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, असेही मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या बैठकीस शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेशकुमार वाघमारे, अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे, माजी सनदी अधिकारी बाजीराव जाधव, 'टीस'च्या संध्या लिमये, वैशाली कोल्हे, सल्लागार समीर घोष, विजय कान्हेकर, डॉ.संतोष मुंडे तसेच अपंग विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध अधिकाऱ्यांनी दिव्यांग विकास विभाग निर्मितीबाबत सूचना केल्या.

Post a comment

 
Top