web-ads-yml-750x100

Breaking News

नियोजनामध्ये शाश्वत विकास आणि हवामान बदलाचा विचार होणे आवश्यक - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

BY – युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
शहरे आणि गावांच्या विकासात सामाजिक स्वास्थ्याचा विचार आणि दीर्घकालीन नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करताना हवामान बदलाचा विचार होणे आवश्यक आहे. ईज ऑफ डुईंग बिजनेस प्रमाणेच इज ऑफ लिव्हिंगचे नियोजन होणे आवश्यक आहे. बदलत्या परिस्थिती पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शहर क्षेत्रीय नियोजन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
वाशी येथील सिडको भवन येथे राष्ट्रीय स्तरावरील नगर नियोजन विषयक संस्थेच्या (institute of town planner india) वतीने आयोजित ६८ व्या राष्ट्रीय नगर व क्षेत्र नियोजनकार परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयटीपीआय संस्थेचे अध्यक्ष प्रा. मेश्राम, उपाध्यक्ष मिलिंद पाटील, सरचिटणीस प्रदीप कपूर, जितेंद्र भोपळे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. ठाकरे म्हणाले, नगर नियोजन हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नागरिकरणाच्या आव्हानाबरोबरच शहरी आणि ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हे देखील महत्त्वाचे आहे. नगररचना आणि नियोजनामध्ये महाराष्ट्र राज्य हे प्रवर्तक राज्य आहे.  शहरांच्या विकासाबरोबरच पर्यावरण देखील महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पर्यावरणपूरक बाबींवर नियोजनात भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना शाश्वत विकासांबरोबरच सर्व सोईसुविधा प्रदान करणे हे सरकारचे काम आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊनच नगर विकासाचे नियोजन केले पाहिजे. सर्व घटकांना योग्य तो न्याय देणे आवश्यक आहे. भुतकाळाकडून धडे घेऊन भविष्यकाळाचे नियोजन करताना जागतिकस्तरावरील घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच कृती करताना ग्लोबल आणि लोकल यांचा मेळ घातला पाहिजे. वातावरणातील बदल हा आज अनेक समस्यांचे कारण आहे. त्याचे दुष्परिणाम जग अनुभवते आहे. याला सामोरे जाण्यासाठी शाश्वत व नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. वातावरणाचे संतुलन आपण विविध उपाययोजनांच्या माध्यमातून टिकवून ठेवण्यासाठी नियोजन केले आहे. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, शहरी वने व शेती असे प्रयोग आपण केले आहे व त्याला मिळालेला प्रतिसाद अतिशय सकारात्मक असल्याचे श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


No comments