0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
शहराच्या मध्यभागी असलेली टेकडी, गर्द झाडी, उत्कृष्ट स्थापत्य आणि त्याची काटेकोर राखलेली निगा यामुळे येथील राजभवन हे शहराचा किरीट ठरले आहे. गेल्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या वास्तूने तो वारसा समर्थपणे जपला आहे.   गुलाब उद्यान, नक्षत्र उद्यान, निवडुंग वन, औषधी वनस्पती उद्यान, स्वतंत्र फुलपाखरू उद्यान अशी विविध उद्याने विकसित केल्याने या वास्तूचे राजवैभव वृद्धिंगत झाले आहे. या परिसरात विविध 140 हून अधिक पक्षांची नोंद झाली असून 50 हून अधिक मोरांचा केकारव ऐकू येतो.
ब्रिटीश कालखंडात निर्माण झालेल्या आणि 94 एकर परिसरात वसलेल्या या वास्तू आणि परिसराने ब्रिटीश कमिशनरचे निवासस्थान,मध्य प्रांताच्या राज्यपालांचे निवासस्थान आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असा प्रवास पाहिला आहे. कमानींवरील नक्षीकाम, भव्य आणि वेगवेगळ्या भागात उघडणारी प्रवेशद्वारे, दरबार हॉल, उच्च दर्जाचे गालीचे आणि समोर गच्च हिरवे लॉन या वास्तूची श्रीमंती वाढवितात. लाकडी कोरीव फर्निचर,  विविध व्यक्तिचित्रे यांनी सजलेले राजभवन इतिहास आणि वर्तमानाची दुवा जुळवून आहेत. शिवकालातील महातोफ राजभवनाची भव्यता ठळक करत आहे. या तोफेवर पर्शियन भाषेत तत्कालीन राज्यकर्त्यांचा उल्लेख आढळतो. राज्यपाल महोदयांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर या राजभवनाबाबतचे एक चालता-बोलता विश्वकोशच आहेत. अगदी बारीकसारीक बाबीही ते आत्मीयतेने सांगतात. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे येथील राजभवनापेक्षा नागपूरचे राजभवन कसे वेगळे आहे ते स्पष्ट  करतात.राजभवनात निर्माण करण्यात आलेल्या जैवविविधता उद्यानामुळे ते आता वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. शेकडो वृक्षवेली, गुलाबांच्या 257 हून अधिक प्रजाती, करंजपासून ते आंब्यापर्यंतच्या अनेक वृक्षांनी हे राजभवन समृद्ध आहे.


Post a Comment

 
Top