0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
‘हुनर हाट’ हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुपच आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एम एम आर डी ए मैदानावर भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित ‘हुनर हाट’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे सचिव पी. के. दास, आणि केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी  राज्यपाल यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.राज्यपाल म्हणाले, 'हुनर हाट’ या भारत सरकारच्या उपक्रमामुळे छोट्या घटकातील कलाकारांना वाव मिळून त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. मार्केट आणि संधी उपलब्ध झाल्याने या कलाकारांना आर्थिक नफा मिळत आहे. हे कलाकार भारताची परंपरा अबाधित ठेवतात आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची शिकवण देतात, भारत सरकारच्या योजना अशा घटकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. या प्रदर्शनाचा वाढता प्रतिसाद पाहता प्रदर्शनाचे आणखी दोन दिवस वाढवावे लागतील. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारा आयोजित ‘हुनर हाट’ दस्तकार, शिल्पकारांसाठी ‘एम्पॉवरमेन्ट- एम्प्लॉयमेंट एक्सचेंज’ म्हणून सिद्ध होत आहे. दस्तकार शिल्पकारांना बाजारपेठ देण्यासाठी देशाच्या विविध भागात आयोजित ‘हुनर हाट’ प्रामाणिक आणि विश्वसनीय ब्रँड बनला आहे.

‘हुनर हाट’मध्ये अवधी खाना, राजस्थानी दाल बाटी चुरमा, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन व्यंजन, केरळी मलबार फूड, तामिळ व्यंजन, बंगाली मिठाई, सुगंधी पान, ओडिसी सिल्व्हर फिलीग्री उत्पादन, जम्मू काश्मीरची प्रसिद्ध विलो बैट या विशेष खाद्यपदार्थांचा समावेश आहे. प्रदर्शन कालावधीत कव्वाली, सुफी संगीत, नृत्य यांसह अन्य सांस्कृतिक कार्यक्रम ‘हुनर हाट’चे आकर्षण ठरणार आहे.

Post a comment

 
Top