0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती दर्शविणारा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जनतेसमोर मांडणार असल्याचे व ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तिला शिस्त आणण्यासाठी वचनबद्ध राहणार असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज संयुक्त सभागृहात झालेल्या अभिभाषणात सांगितले. विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहात राज्यपालांचे मराठीत अभिभाषण झाले. 
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- ‍निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, विधानमंडळ सदस्य उपस्थित होते.शासन राज्यातील जनतेला स्वच्छ, पारदर्शक आणि निर्णयाभिमुख प्रशासन देईल, अशी ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, राज्यात ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे 34 जिल्ह्यातील 349 तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले. 
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी शासन आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. राज्यपालांनी ग्रामीण पत क्षेत्राची दुरावस्था दूर करण्याची गरज आपल्या अभिभाषणादरम्यान व्यक्त केली. शेतमालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीने, मराठवाडा, विदर्भातील  दुष्काळग्रस्त भागामध्ये शाश्वत पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने शासन उपाययोजना हाती घेणार असल्याचेही ते म्हणाले.खाजगी क्षेत्रातील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी 80 टक्के आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले की,  राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया ही सुरु करण्यात येणार आहे. महिलांना समान संधी आणि त्यांची सुरक्षितता याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण मोफत देण्याचा शासनाचा आटोकाट प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

Post a comment

 
Top