0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील सतरा वर्षीय कॉलेज युवतीचा वाढदिवसाच्या दिवशीच  एका मंदिरातील घंटेला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरासह जिह्यात एकच खळबळ उडाली. वाढदिवसाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे ही आत्महत्या की घातपात अशा चर्चेने परिसर ढवळून निघाला आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने घटनास्थळाकडे बघ्यांची गर्दी वाढली. जिल्हा पोलीस प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे. कौसर नासिर नायकवडी(वय17) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे राहणाऱ्या तरुणीचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी ती येथील गजानन महाराज मंदिरात एका मैत्रिणीसह गेली होती. तेथे गावातीलच चार व बाहेर गावचे दोन असे सहा मित्रही आले होते. वाढदिवस झाल्यानंतर मैत्रिणीला तिने घरी जाण्यास सांगितले व ते तरुणही तेथून निघाले. दरम्यानच्या काळात गावातील काही शेतकरी महिला मंदिरात गेले असता अडीचच्या सुमारास त्यांना मंदिरातील घंटीला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणीचा  मृतदेह आढळला. ही बातमी गावात समजल्याने तिच्या जवळचे काही नातेवाईक तेथे आले. त्यांनी ते प्रेत काढून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले व तेथुन लगेचच ते घरी नेले. या दरम्यान राधानगरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सोलांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. परंतु नातेवाईकांनी इन कॅमेरा उत्तरीय तपासणी व्हावी अशी मागणी केल्याने तो कोल्हापूरला सी.पी.आर.रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी सीपीआर हॉस्पिटल परिसरात तणाव निर्माण झाला होता.


Post a Comment

 
Top