0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
महाराष्ट्र मेट्रोसाठी माजिवडा जंक्शन ते गायमुख दरम्यान टाकण्यात येणारी विद्युत वाहिनी भूमिगत डक्ट बनवून त्याद्वारे टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज मेट्रो प्रकल्पाच्या आढावा बैठकीत घेतला. दरम्यान मेट्रो प्रकल्प उभारणीमध्ये  येणा-या अडचणी सोडविण्यासाठी वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी मेट्रो तसेच महापालिका अधिका-यांना दिल्या.आज श्री. जयस्वाल यांनी नागरी संशोधन केंद्र येथे मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे अधिकारी, महावितरण संस्थेचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत श्री. जयस्वाल यांनी मेट्रोसाठी जी विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे ती विद्युत वाहिनी वरून न टाकता भूमिगत डक्ट टाकून त्यामधून टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या डक्टला जोडूनच इतर सेवा वाहिन्यांसाठीही दुसरे डक्ट बनविण्यात येणार असून त्याचा वाढीव खर्च महापालिकेच्यावतीने करण्यात येईल असेही श्री. जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
            मेट्रोच्या पियर उभारणीच्या कामामध्ये वाहतुक कोंडीमुळे, विद्युत पोलमुळे, विद्युत वाहिन्या, वृक्षतोड, पाणीपुरवठा पाईप लाईन किंवा इतर वाहिन्यांमुळे अडथळा येत असल्यास त्याचा वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना देतानाच श्री. जयस्वाल चार टप्प्यातील मेट्रोचे काम युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना दिल्या.

            यावेळी महापालिका आयुक्त यांनी दिवा आरओबी, खारेगाव आरओबी कामाचाही आढावा घेतला. ही सर्व कामे एप्रिल ते मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच दिवा आरओबीमध्ये अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याचे आदेशही त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले. तसेच कळवा उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा घेवून ते काम जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Post a comment

 
Top