0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्रामध्ये फार मोठे पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भंडारा, गोंदीया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून त्यांनी या सुशोभित एक्सप्रेसला रवाना केले. विविध रेल्वे एक्सप्रेसवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची अशीच जाहिरात करुन देशभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करु, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.एक्सप्रेसवर नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गचित्रांसह एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही झळकली आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद - सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारला आहे.मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, एमटीडीसीच्या या उपक्रमातून दख्खनची राणी आता वेगळ्या स्वरुपात जनतेसमोर येत आहे. पर्यटनस्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची ही फारच चांगली संकल्पना आहे. पर्यटक आले तर त्यांच्यामार्फत स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो. राज्यात बोधलकसा, नागझिरा सारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत. एमटीडीसीने अशा पर्यटनस्थळांना प्रकाशझोतात आणण्यासाठी राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यापुढील काळात राज्यातील इतरही पर्यटनस्थळांची माहिती रेल्वे, एसटी आदींच्या माध्यमातून प्रसारित करुन राज्यातील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top