0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली  |
पालकांबरोबर गैरव्यवहार करणाऱ्या किंवा जेष्ठांना सोडून देणाऱ्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दहा हजार रुपयांचा दंड किंवा या दोन्हीही शिक्षा असे विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी सादर करण्यात आले आहे. या विधेयकामुळे 'ज्येष्ठ नागरिक आणि पालक कल्याणकारी कायदा, 2007'मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री तावरचंद गेहलोत यांच्याकडून हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. गैरव्यवहारामध्ये शारीरिक, तोंडी, भावनिक आणि आर्थिक गोष्टींचा समावेश आहे. मुलांनी जर पालकांची काळजी घेतली नाही, त्यांना सोडून दिले, त्यांना जखमी केले, शारीरिक किंवा मानसिक त्रास दिला तर यासाठी कायद्यातील नव्या सुधारणेनुसार शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच ज्येष्ठांची मुले या व्याख्येमध्ये त्यांची स्वत:ची मुले, दत्तक घेतलेली, सावत्र, जावई, सून, नात, नातू आणि अल्पवयीन मुलांच्या बाबतीत कायदेशीर पालक यांचा समावेश करण्यात आला आहे.
या विधेयकाच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी एका लवादाची स्थापना करण्यात येईल. या लवादाकडे ज्येष्ठांना दाद मागता येईल. 80 वयावरील ज्येष्ठांनी या लवादाकडे केलेले अर्ज 60 दिवसांमध्ये निकाली काढण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे लवादाला हा कालावधी केवळ 30 दिवसांनी वाढवता येईल. ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पोलीस स्थानकांमध्ये सहायक उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाचा पोलीस अधिकारी तैनात केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्येष्ठांसाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत असणार आहे. या पथकाचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक आणि त्यावरील दर्जाचे अधिकारी करतील.

Post a Comment

 
Top