0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
लोकांचे जीवन सुकर करणे हे लोकसेवा हमी कायद्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गतिमान व पारदर्शक लोकसेवा देण्यासाठी किमान शासन, कार्य प्रणालीतील सुसूत्रता, साधेपणा आणि लोकसेवा देण्यासाठी असलेली कालमर्यादा ही त्रिसूत्री आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपतींचे सचिव संजय कोठारी यांनी आज येथे केले.गतिमान लोकसेवा देण्यात शासनाची भूमिका’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे संजय कोठारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी उपस्थित लोकसेवकांना ते मार्गदर्शन करीत होते. हॉटेल रॅडीसन ब्ल्यू येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी  महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, लोकसेवा व तक्रार निवारण आयोगाच्या उपसचिव  श्रीमती रेणू अरोरा, कोकण विभाग लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त मेधा गाडगीळ, सामान्य प्रशासन विभागाच्या  सचिव श्रीमती अंशू सिन्हा, नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच यावेळी केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण विभागाचे अतिरिक्त सचिव व्ही. श्रीनिवास, पंजाबच्या लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनदीपसिंग संधू,  हरयाणा लोकसेवा आयोगाचे  आयुक्त  हरदीपकुमार, कर्नाटकच्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती शालिनी रजनीश, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजीव यदुवंशी, तामिळनाडूचे माहिती व तंत्रज्ञान आयुक्त संतोष मिश्रा, केरळच्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सदस्या श्रीमती शीला थॉमस, रेल्वेचे कार्यकारी  संचालक विवेक श्रीवास्तव तसेच देशभरातून आलेले प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या परिषदेत देशभरातील 22 राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.यावेळी मार्गदर्शन करताना संजय कोठारी म्हणाले, लोकांचे जीवन सुकर करणे हे प्रशासकीय  सेवेचे उद्दिष्ट आहे. प्रशासकीय प्रक्रियेचे सखोल ज्ञान नागरिकांना असणे अपेक्षित नाही.  मात्र लोकसेवा हमी कायदा हा लोकांना विहित कालावधीत पारदर्शक सेवेची हमी देतो.  ते म्हणाले की, या कायद्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांच्या हातात अधिकार आले आहेत.

Post a comment

 
Top