0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
प्रचंड नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तत्पूर्वी, अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनीही काही कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आमच्याकडे बहुमत उरलेलं नाही, हे स्पष्ट आहे. यामुळे आता जे कोणी सत्तास्थापन करतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
23 नोव्हेंबर रोजी अचानक पणे सकाळी 8च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच जबरदस्त धक्का दिला होता. त्यांच्या अचानक शपथग्रहण आणि एका रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही  पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारला 24 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर घडलेल्या अनाकलनीय राजकीय घडामोडींनंतर अजित पवारांनी भाजपची साथ सोडत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अशा प्रकारे फडणवीस सरकार औट घटकेचं ठरून आता महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.


Post a comment

 
Top