0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून  दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्सची  दखल देशातील आघाडीचे  हिंदी न्यूज पोर्टल प्रभासाक्षी ने घेतली असून 8 नोव्हेंबर रोजी प्रभासाक्षीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात परिचय केंद्राला सन्मानित करण्यात येणार आहे.प्रभासाक्षी पोर्टलद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणाऱ्या  देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी (भाजपा) या राजकीय पक्षांसह महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 8 नाव्हेंबर रोजी येथील कॉन्स्टिट्यूशन  क्लबमध्ये 'प्रभासाक्षी'च्या 18 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत 'प्रभासाक्षी'द्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या अपडेटचेही सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाजमाध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणित) ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधीत राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले आहेत. ट्विटरद्वारे 1952 पासून ते 2014 पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविध्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच या कालावधीतील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले. त्यासाठी इन्फोग्राफिक्स , व्हिडिओ आदींचा प्रभावी वापर करण्यात आला.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही  ट्विटर हँडलवरुन दररोज महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत. ट्विटरसोबतच कार्यालयाचे फेसबुक पेज(तीन), ब्लॉग, यूट्यूब चॅनेल, वॉटस् ॲप ग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते.समाजमाध्यमांद्वारे अचूक, योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी  घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाची पताका राजधानी दिल्लीत मानाने उंचविण्याचे काम करणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे आधुनिक युगाची पावले ओळखून समाजमाध्यमांचा प्रभावी  व योग्य वापर करीत आहे. ‘प्रभासाक्षी या आघाडीच्या न्यूज पोर्टलने परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या जनसंपर्काची घेतलेली दखल कार्यालयाच्या कार्याचा विशेष बहुमान आहे.

Post a comment

 
Top