0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
न्यूझीलंडचे खासदार ग्रेग ओ’कॉनॉर यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने आज राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते.न्यूझीलंडचे खासदार कंवलजीतसिंग बक्षी, टीम मॅकलँडो, मेलीसा ली, न्यूझीलंड संसदेच्या (चेंबर) संसदीय मैत्र गटाच्या सचिव नताली मूर यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. यावेळी महाराष्ट्र विधान मंडळाचे उपसचिव शिवदर्शन साठे उपस्थित होते.प्रारंभी शिष्टमंडळाचे स्वागत करुन श्री. कुंटे यांनी महाराष्ट्राची कृषी, अर्थव्यवस्था, उद्योग आदींविषयी संक्षिप्त माहिती दिली. देशामध्ये वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये राज्य देशात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानमंडळाची रचना, सभागृहे, कामकाज पद्धती, केंद्र-राज्य संबंध, राज्य शासनाच्या प्रशासनाची रचना, कररचना आदींविषयी माहिती श्री. कुंटे आणि श्री. भागवत यांनी दिली. ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ मध्ये राज्य चांगल्या प्रकारे काम करत आहे. न्यूझीलंडबरोबरचे संबंध अधिक दृढ होण्यासह, विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी या भेटीमुळे मदत होईल, अशी आशा श्री. कुंटे यांनी यावेळी व्यक्‍त केली.न्यूझीलंड उद्योग, डेअरी क्षेत्रात अग्रेसर असून दर्जेदार उच्चशिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याचे न्यूझीलंडच्या खासदारांनी सांगितले. त्यांनी तेथील संसदीय व्यवस्थेची, प्रशासनाची माहिती देऊन न्यूझीलंडला भेट द्यावी, असे सांगितले. या भेटीदरम्यान श्री. कुंटे आणि न्यूझीलंडच्या खासदारांनी परस्परांना स्मृतिचिन्ह दिले.

Post a comment

 
Top