0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभे करणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीत ज्या सवलती दिल्या जातात, त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, रोजगार हमी योजनेद्वारे नुकसानग्रस्त शेताच्या सफाई कामाचा समावेश करून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी केले, त्याचा अहवाल सादर करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या मागण्या आदीबाबत या बैठकीत विविध मुद्दे मांडले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, पूर परिस्थिती ह्या घटना गेल्या 30 ते 40 वर्षांत प्रथमच इतक्या तीव्रतेने घडल्या आहेत. राज्यात सर्वच भागात पीक परिस्थिती चांगली असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

Post a comment

 
Top