0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे  |
रब्बी हंगामापूर्वी भाजीपाला पिकाखालील क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनखाली १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेवून रब्बी हंगामात जास्तीजास्त भाजीपला पिकाखालील क्षेत्र वाढविण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. या दृष्टीकोनातून जिल्हा परिषद कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडी संदर्भात मार्गदर्शन करून पिक क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मदत करण्यात येणार आहे.
     या गावसभेत शेतकऱ्यांना हरबरा, वाल, मुग, आणि इतर कडधान्य यांच्या लागवडीबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच भाजीपाला पिके, किडकनाशक फवारणी मार्गदर्शन, बीजप्रक्रिया, जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या कृषि विषयक योजनांची माहिती या निमित्ताने शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. बंधारे बांधकामात पुढाकार घेणाऱ्या गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र भाजीपाला या पिकाखाली येईल याबाबतही नियोजन करण्यात येणार आहे.लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, विषय समिती आणि पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आयोजित गावसभांमध्ये  कृषि अधिकारी यांच्यासह, प्रगतशील शेतकरी, कोकण कृषि विद्यापीठ, कृषि संसोधन केंद्र कर्जत, खाजगी कृषि महाविद्यालय, येथील कृषि मार्गदर्शक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.या मोहिमेसाठी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, कृषि निविष्ठा विक्रिते, महाबीज, निविष्ठा उत्पादक कंपनी, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर, या संस्थाचाही सहभाग घेण्यात येणार असल्याची माहिती कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली.


Post a comment

 
Top