0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात आजपासून सुरु झालेल्यावर्ल्ड ट्रेड मार्ट प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला जगभरातील पर्यटन व्यावसायिकांसह हौशी पर्यटक, पत्रकार, अभ्यासक, अधिकारी आदींनी भेट देऊन राज्यातील ताडोबा अभयारण्यापासून विविध समुद्रकिनारे, गुंफा, किल्ले,जंगले आदींची माहिती घेतली. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल यांनी या सर्वांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाची त्यांना माहिती दिली. तसेच महाराष्ट्राला भेट देण्यासाठी निश्चित यावे, असे आग्रहाचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.वर्ल्ड ट्रेड मार्ट प्रदर्शनात जगभरातील बहुतांश सर्व देशांनी सहभाग घेतला आहे. आपापल्या देशातील पर्यटनस्थळांची माहिती देऊन जगभरातील पर्यटक, अभ्यासक,व्यावसायिक आदींना आपल्या देशांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. महाराष्ट्रानेही यात सहभागी होत राज्यातील पर्यटन वैभवाचे द्वार जगभरातील पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांसमोर खुले केले आहे. आज केंद्रीय पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top