0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
शासकीय कामकाजामध्ये  वित्त विषयक सर्व बाबी गांभीर्याने हाताळण्याबरोबरच त्यांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देण्यात यावा, तसेच या बाबी हाताळताना आर्थिक शिस्तीचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात  प्रलंबित संक्षिप्त देयके व  उपयोगिता प्रमाणपत्र या अनुषंगाने  सह संचालक लेखा  व कोषागारे कोकण विभाग यांच्या वतीने  कोकण विभागातील  आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या  एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ उप महालेखापाल श्री एस. एस  सरफरे, सह संचालक  लेखा व कोषागारे श्री सिताराम काळे, जिल्हा कोषागार अधिकारी (उपसंचालक श्रेणी) श्री राजेश भोईर, सहायक लेखाधिकारी  श्रीमती  ललीथा नारायणस्वामी  सहायक संचालक श्री संजय गोरे आदी उपस्थित होते.
          श्री. नार्वेकर म्हणाले, शासकीय कामकाज करतांना वित्त विषया बाबत सर्वजण अतिशय जागरूक असतात. तरी कालमर्यादा किवा अन्य काही बाबींमुळे संक्षिप्त देयके व  उपयोगिता प्रमाणपत्रांचा वेळेत निपटारा होत नाही. सर्व  आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी  प्रलंबित संक्षिप्त  देयकांचा  व उयोगीता प्रमाणपत्रांचा वेळेत निपटारा करणे आवश्यक आहे. सह संचालक लेख व कोषागारे कोकण विभाग यांनी सकारात्मक उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या ठिकाणी सर्व लेखाविषयक प्रश्नांची उत्तरे मिळणार असुन सर्वांच्या शंकांचे निश्चितच समाधान होईल असा विश्वास श्री नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला.वरिष्ठ उप महालेखापाल श्री सरफरे यांनी  प्रलंबित संक्षिप्त देयक, उपयोगिता प्रमाणपत्र या अनुषंगाने प्रत्येक आहरण व संवितरण अधिका-याने घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. एखाद्या ठिकाणी बदली झाल्यानंतर उद्या परत बदली होणार आहे हा दृष्टीकोन ठेवून काखाम केले तर सर्व देयकांचा वेळेत व जलद गतीने निपटारा करणे सहज शक्य आहे, अनेकदा वेळेवर सादर न केलेली देयके प्रलंबित राहतात आणि नंतर  ती  संख्या वाढत जाते. तसेच उशीर झाल्याने  देयकांचा चा वेळेत निपटारा होत नाही.  त्याचे लेखा विषयक प्रतिकूल परिणाम होतात. विहित मुदतीत  तपशीलवार देयके  सादर करण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाने ठेवला तर कुठल्याही प्रकारची देयके प्रलंबित राहणार नाहीत असे ही त्यांनी सांगितले. प्रलंबित संक्षिप्त देयके व  उपयोगिता प्रमाणपत्रांची अद्ययावत स्थिती महालेखापाल मुंबई कार्यालयाच्या संकेत स्थळावर (http:// agmaha.nic.in) उपलब्ध असल्याची माहिती  प्रात्यक्षिकासह  श्री सरफरे यांनी यावेळी  दिली.सहसंचालक श्री काळे यांनी संपूर्ण राज्यामध्ये विभागवार या कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.  महालेखापाल नागपूर आणि मुंबई यांनी संक्षिप्त देयके व उपयोगिता प्रमाण पत्राच्या प्रलंबिततेची  बाब लेखा व कोषागारे प्रधान सचिव  श्री नितीन गद्रे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सदर प्रलंबित संक्षिप्त देयकांचा तातडीने निपटारा करण्यासाठी विभागवार कार्यशाळा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  या निर्णयानुसार संचालक लेखा कोषागारे श्री जयगोपाल मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात विभागवार कार्यशाळा घेण्यात येत असल्याचे श्री काळे यांनी सांगितले
            दुसऱ्या सत्रात सहायक लेखाधिकारी श्रीमती ललीथा नारायणस्वामी यांनी  पॉवर पॉइंट प्रेजेंटेशनसह  सविस्तर मार्गदर्शन केले. देयके सादर करतांना घ्यावयाची काळजी, उपयोगिता प्रमाण पत्र, प्रलंबीत देयकाबाबत नियमातील तरतुदी  यांवर सखोल माहिती दिली.  यावेळी अधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्न व शंकांचे समाधान केले.सहाय्यक संचालक श्री संजय गोरे यांनी आभार प्रदर्शन केले. तर अप्पर कोषागार अधिकारी कल्पना थोरात यांनी सूत्र संचालन केले.या कार्यशाळेस ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड  जिल्ह्यातील २५० आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून संबधित सर्व घटकांचा  महालेखापाल कार्यालयाशी थेट  संवाद होवून व विषयाबाबत जागरुकता निर्माण होवून  प्रलंबित संक्षिप्त देयके व  उपयोगिता प्रमाणपत्रांचा निपटारा जलद गतीने होण्यास चालना मिळणार आहे.

Post a comment

 
Top