0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे  |
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासन व ठाणे क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्तपणे जिल्ह्यात महा मतदार जागृती रथ फिरवण्यात येणार आहे. या रथाला आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखवून रवाना केले.यावेळी प्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमण, स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर, उप जिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा क्षेत्र आहेत. विधानसभा क्षेत्रात मतदानाची  टक्केवारी वाढावी यासाठी पुढील दोन दिवस मतदानाची जागृती करत हा रथ फिरणार आहे. मतदान जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत ( स्वीप ) अंतर्गत जिल्हात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून हा रथ विधानसभा क्षेत्रात फिरणार आहे.मतदान करा, मतदान करा , सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा असा संदेश देणाऱ्या या रथा सोबत सात कलाकारांचा चमू असून नृत्य- गाण्यातून तसेच ऑडीओ-व्हिडीओच्या ,माध्यमातून हा रथ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Post a comment

 
Top