0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – गडचिरोली  |
गडचिरोलीमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बापू पांडू गावडे (45 वर्ष) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत होते. बापू गावडे निवडणूक कर्तव्यावर पायी चालत जात असताना भोवळ येऊन पडले. त्यांचा चंद्रपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. विधानसभा निवडणूकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ते तैनात होते. मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरून पुरसलगोंदी केंद्राकडे पायी जात असतांना गावडे हे भोवळ येऊन पडले. त्यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. माञ प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना प्रथम अहेरी आणि तेथून चंद्रपुर येथे हलविण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वीही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यावरील एका शिक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Post a comment

 
Top