0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |  
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला २८ लक्ष रुपये पर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. सर्व उमेदवारांनी या मर्यादेतच निवडणूक खर्च करावा, तसेच निवडणूक खर्चाची माहिती विहित नमुन्यात व निश्चित कालमर्यादेत निवडणूक यंत्रणेला सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
      ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात २१ ऑक्टोबर रोजी निवडणूका पार पडणार आहेत. त्याची आदर्श आचार संहिता २१ सप्टेंबर पासून लागू झाली आहे. त्यानुसार निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाल्या नंतर निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उमेदवारांकडून सुरु होईल. त्यामुळे निवडणूकीत होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा उमेदवारांना जिल्हा निवडणूक विभागास देणे बंधनकारक आहे. प्रत्येक उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केल्या पासून प्रतिदिवसाचा खर्च विहित नमुन्यात ठेवायचा आहे. तसेच प्रत्येक उमेदवारास विधानसभा खर्चाची मर्यादा २८ लाख इतकी आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने हे खाते नामनिर्देशना पूर्वी उघडणे आवश्यक असून त्याचा क्रमांक नामनिर्देशन भरताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायवयाचा आहे. त्याचबरोबर निवडणूक विषयक सर्व खर्च याच खात्यातून करायचा आहे.उमेदवाराकडून कोणत्याही एका व्यक्तीस अथवा संस्थेस निवडवणूक प्रक्रियेदरम्यान देयरक्कम १० हजार पेक्षा अधिक असल्यास धनादेश/धनाकर्ष/ सी./ए/ ट्रान्स्फरनेच करता येणार आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी आलेल्या सर्व रकमा सदर खात्यात जमा करणे व सर्व निवडणूक खर्च त्याच खात्यातून करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार जी रक्कम  रोखीने खर्च करणार आहे ती रक्कम प्रथम बँकेतून काढणे आवश्यक आहे. रोखीने केलेल्या व्यवहाराची नोंद उमेदवाराच्या बँक नोंद वही तसेच रोख नोंद वहीमध्ये घेणे आवश्यक आहे. जर उमेदवारानी विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न केल्यास तीन वर्षा करीता संबंधित उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतो. असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून सुध्दा प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची छाया नोंदवही (शॅडो रजिस्टर) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही नोंदींमध्ये तफावत येऊ नये, यासाठी उमेदवारांनी आपल्या सर्व खर्चाच्या नोंदी अचूकपणे निवडणूक यंत्रणेला सादर कराव्यात.  सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी खर्चाची माहिती वेळोवेळी निवडणूक यंत्रणेला सादर करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.Post a comment

 
Top