0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
जिल्ह्यातील उच्चस्तरीय अधिकारी ते शाळकरी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ, महिला हातात झाडू घेवून प्रत्येकजण गाव स्वच्छता करताना दिसत होते. गावात साठलेला प्लास्टिक कचरा गोळ्या करण्यात सगळ्यांची लगबग होती. शाळकरी मुलं स्वच्छतेचा फलक हाती घेत प्लास्टिक बंदीचा संदेश देत गावातून प्रभातफेरी काढत होते. असे भारावलेले वातावरण जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज पाहायला मिळाले. निमित्त होते, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयती निमित्त जिल्ह्यात साजरा झालेला स्वच्छ भारत दिवसाचे.ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या हस्ते या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायती येथून करण्यात आला. यावेळी श्री. सोनवणे म्हणाले, आपला जिल्हा हा हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र तरीही गावागावात शाश्वत स्वच्छता टिकून राहायला हवी. स्वच्छलयाचा वापर प्रत्येक घरात व्हायला हवा. संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा आदर्श ठेवून गाव स्वच्छ-सुंदर बनविण्याची जबाबदारी प्रत्येक गावकर्यांची आहे. गावातील नागरिकांनी प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा. वाढता प्लास्टिकचा भस्मासुर रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने  पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही त्यांनी केले. यानिमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सॅनिटरी डिस्पोजेबल मिशिन बसवण्यात आली. या मशिनचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या उपक्रमासाठी  प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) अशोक पाटील,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छ व पाणी ) छायादेवी शिसोदे, गट विकास अधिकारी (भिवंडी)  अशोक सोनटक्के आदि मान्यवर उपस्थित होते.  या मान्यवरांनी समयोचीत भाषणं केली.  या कार्यक्रमा नंतर गावात प्लास्टिक गोळा करण्याचे श्रमदान करण्यात आले. याप्रसंगी  गावकऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

Post a comment

 
Top