0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित होणार असून यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून या कामास गती मिळणार आहे. फास्टॅग संदर्भात आज राज्याच्या वतीने सामंजस्य कराराचे अनौपचारिक हस्तांतरण झाले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीने देशभरात कार्यरत टोल प्लाझांवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्व‍ित असून मंत्रालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील काही राज्यांनी ही यंत्रणा राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रानेही फास्टॅग यंत्रणा राबविण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या भारतीय रस्ते वाहतूक व्यवस्थापन कंपनी (आयएचएमसीएल) सोबत दोन महिन्यांपूर्वीच सामंजस्य करार केला आहे.
डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आज आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आणि ‘आयएचएमसीएल’चे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये अनौपचारिकरित्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले.

Post a comment

 
Top