0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात बैठक सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, खासदार, आमदार बैठकीला उपस्थित आहेत. पवार कुटुंबीयही विधानसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच एकत्रितपणे या बैठकीच्या निमित्ताने मुंबईत हजर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. अजित पवार यांचे नाव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुचवले होते. त्यांच्या या प्रस्तावाला सर्वांनी एकमताने दुजोरा दिला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात पक्ष चांगल्या पद्धतीने उभा राहील असा विश्वास आहे. अजितदादाची विधिमंडळ पक्षनेतेपदी आम्ही एकमताने निवड करत आहोत. भाषणाच्या सुरुवातीला पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन आणि स्वागत करतो. मागच्या पाच वर्षांत विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षात अत्यंत प्रभावी काम धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी केलंय हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. संघर्ष यात्रा, हल्लाबोल यात्रा आणि सरकारच्या विरोधात प्रभावी भूमिका मांडली, शिवाय शिवसुराज्य यात्रासुद्धा काढली. डॉ. अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी या दोन अनमोल माणसांनी अत्यंत प्रभावशाली काम करून शिवसुराज्य यात्रेत लोकांमध्ये जनजागृती केली.

Post a comment

 
Top