0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. मतमोजणीसाठी आता काउंटडाऊन सुरू झाले आहे.
मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे ईटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.

Post a comment

 
Top