0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - ठाणे ।
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय आणि यूएनडीपी अंतर्गत दिल्ली येथे १८ आणि १९ सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय युवा संसदेत देशातील निवडक ८० युवकांनी भाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविणारे नेहरू युवा केंद्र ठाण्याचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक दत्तात्रय पाटील यांची व पालघर जिल्ह्यातून आदिवासी ग्रामीण भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर रामदास लहारे यांची निवड करण्यात आली होती. युवा संसदेत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भूमिका दत्तात्रय पाटील यांनी केली. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची भूमिका पालघर जिल्ह्यातील युवक रामदास लहारे यांनी केली. आदिवासी समाजातील शिक्षण व आरोग्याच्या समस्येवर तसेच शहरी भागातील वाढते प्रदूषण यावर या युवकांनी भूमिका मांडली. तसेच ग्रामीण ठाणे, पालघर जिल्ह्यातील कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना केली. राष्ट्रीय युवा संसदेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे सचिव असित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाले आणि समारोप सत्रात युनायटेड नेशन चे कंट्री कॉरडीनेटर अरुण सहदेव यांनी सहभागींना प्रमाणपत्र दिले. या कार्यक्रमात देशभरातून आलेल्या युवकांनी शिक्षण, हवामान बदल तसेच जलसंधारण, आरोग्य आणि लिंग समावेश यावर आधारित विषयावर चर्चा केली. संसदे च्या कार्यप्रणाली प्रमाणे प्रश्न उत्तरांचा तास, अजेंडा, विधेयक पास करण्यासाठीचे मतदान अशा सर्व प्रक्रिया पूर्ण करून तीन विधेयकांना मंजुरी देण्यात आली.   

Post a comment

 
Top