BY - युवा
महाराष्ट्र लाईव्ह - कल्याण ।
शीळ-कल्याण-भिवंडी रस्त्यावरील पत्री पुल
परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या
कामाबरोबरच या ठिकाणी तिसरा पुल उभारण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास
महामंडळाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच, शीळ-कल्याण-भिवंडी रस्त्याचे
सहापदरीकरण डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णयही
घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यासाठी एकूण ७७८.११ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना
मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती देखील
करण्यात आली आहे. दुसऱ्या पत्री पुलाचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे
नियोजन असून तिसरा पुल काम सुरू झाल्यापासून १८ महिने आणि काँक्रिटीकरणाचे काम दोन
वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्या
पत्री पुलाची मागणी
केली होती.
सार्वजनिक
बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
संचालक मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा
जुना पत्री पुल धोकादायक झाल्यामुळे तो पाडून त्या ठिकाणी नवा पुल बांधण्याचे काम
सुरू आहे. मात्र, अस्तित्वातील पुल आणि नव्याने बांधण्यात येणारा पुल हे दोन्ही
पुल केवळ दोन पदरीच असून शीळ-कल्याण-भिवंडी रस्ता सहापदरी झाल्यानंतर या ठिकाणी
पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवेल. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या
पुलाला समांतर असा तिसरा पत्री पुल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ५१.३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे तीन
दुपदरी पुलांच्या माध्यमातून येथेही सहा पदरी मार्ग उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीची
समस्या उद्भवणार नाही.
सहापदरीकरण
डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाद्वारे करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्यासाठी
५४३.०६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात यापूर्वीच
१८३ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यातील एकूण ७७८.११
कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शीळफाटा-कल्याण-भिवंडी
रस्त्याच्या टप्पा – २ अंतर्गत मानपाडा चौक, सोनारपाडा चौक, (हॉटेल सुयोग ते
पेंढारकर कॉलेज) आणि बदलापुर चौक (काटई नाका) या ठिकाणी उड्डाणपुल बांधण्यासाठी
१९४.४७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
Post a comment