0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – मुंबई ।
मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा यांच्या हस्ते काल उद्घाटन झाले.
राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. अरोरा यांच्यासह भारत निवडणूक आयोगाचे अन्य निवडणूक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी येथे आले होते. सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी विविध बैठका घेतल्या.  त्यानंतर राज्यात लोकसभा निवडणुकीत राबविलेल्या विशेष उपक्रमांवर आधारित आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या 'पारदर्शक, सुरक्षित, उत्साही' या नावाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. लोकसभा निवडणुकीमध्ये राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची उत्कृष्ट छायाचित्रे आणि माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. यावेळी मतदार जागृती वाहनाचे तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅनचे झेंडी दाखवून उद्घाटन केले.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष पोस्ट तिकिट आणि टपाल आवरणाचे (कव्हर) प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनित मतदार जागृती चित्रफितीचे उद्धाटनही याप्रसंगी करण्यात आले.यावेळी वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा, संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, महाराष्ट्र परिमंडळाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top