0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण करीत असलेले राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना आज (दि.3) शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसेच त्यांचे आभार मानले. राज्यपालांच्या पत्नी विनोदा यांना देखील यावेळी पुष्पगुच्छ देण्यात आला.राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्नीक हैद्राबादकडे रवाना झाले. या छोटेखानी निरोप सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री  गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस आयुक्त संजय बर्वे, प्रधान सचिव राजशिष्टाचार नंदकुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top