0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चावर जिल्‍हा प्रशासनाचे बारीक लक्ष असून त्‍यासाठी विविध पथके कार्यरत करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात केंद्रीय खर्च निरीक्षकांच्‍या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अमलेंदू नाथ मिस्रा, रोहित मेहरा, किरण कट्टा, विजय चौधरी, पीयुष मुखर्जी,  अमरसिंग मेहरा, सैलेन समाद्दर, रोशन लाल हे केंद्रीय खर्च निरीक्षक तसेच सह पोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापन कक्षाचे प्रमुख अजित रेळेकर, ‍निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी राम यांनी निवडणूक यंत्रणेच्‍या तयारीचा आढावा सादर केला. जिल्‍ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील निवडणुका शांततेत आणि निष्‍पक्ष वातावरणात पार पाडण्‍यासाठी सर्व खबरदारी घेण्‍यात आली असून निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्‍यासाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके आदी पथके तैनात करण्‍यात आली आहेत. आयकर विभाग, बँकांचे अधिकारी, खर्च नियंत्रण कक्षातील अधिका-यांना आवश्‍यक ते प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.
  उमेदवारांच्‍या सभा, रॅली आदींचे खर्चाच्‍या दृष्टिकोनातून चित्रीकरण करण्‍यासाठी व्हिडीओ ग्राफर्सना प्रशिक्षण देण्‍यात आले असल्‍याचे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले. सी-व्‍हीजील अॅपवर दाखल झालेल्‍या तक्रारींची तात्‍काळ दखल घेऊन त्‍यावर आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात येत आहे. जिल्‍ह्याचा निवडणूक व्‍यवस्‍थापन आराखडा तयार असून त्‍यानुसार सर्व यंत्रणा सज्‍ज आहेत. प्रदत्‍त बातम्‍या ( पेड न्‍यूज) आणि माध्‍यम प्रमाणीकरण याबाबत समिती कार्यरत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापन कक्षाचे प्रमुख अजित रेळेकर यांनी सहकारी बँका, पत संस्‍था यांच्‍या मार्फत होणा-या आर्थिक व्‍यवहारांवर आवश्‍यक ते लक्ष ठेवण्‍यात येत असून संशयास्‍पद व्‍यवहारांची माहिती आयकर विभागाला कळविण्‍यात येईल, असे सांगितले. खर्च नियंत्रणाबाबत राजकीय पक्षांच्‍या प्रतिनिधींनाही योग्‍य ते प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण भागातील टोल नाक्‍यांसह इतर महत्‍त्‍वाच्‍या ठिकाणांवर नजर ठेवण्‍यात आली असून विविध पथकांच्‍या माध्‍यमातून तपासणीही केली जात असल्याचे सांगितले. अवैध दारुबाबतही योग्‍य ती खबरदारी घेण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.जिल्‍हा निवडणूक यंत्रणेच्‍या तयारीबाबत केंद्रीय खर्च निरीक्षकांनी समाधान व्‍यक्‍त करुन सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. बैठकीस समन्‍वय अधिका-यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top