0
BY - हरिभाऊ बळी,युवा महाराष्ट्र लाइव – दौंड |
दौंड तालुक्यातील भांडगाव गावच्या हद्दीत रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ४ महिन्यांच्या बालिकेच्या डोक्यावरून जेसीबीचे चाक गेल्याने बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि.७) रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जेसीबी चालक फरार झाला आहे.या घटनेत अर्पिता रवी राठोड (वय ४ महिने सध्या रा. खामगाव, ता. दौंड) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बलिकेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडगाव गावच्या हद्दीतील खोर रोड ते वाडीचामळा या दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. या  रस्त्याचे कंत्राटदार श्याम गजानन दोरगे यांच्याकडे काही मजूर या रस्त्यावर काम करीत होते. यावेळी मयत अर्पिता हिस तिच्या आईने रस्त्याच्या कडेला झोपवले होते. यावेळी जेसीबी क्रमांक (एमएच ४२ एएक्स ०१४९) वरील चालक रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने खडी पांगवीत असताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्या अर्पिताच्या डोक्यावरून जेसीबीचे पुढील बाजूचे उजवे चाक गेल्याने अर्पिताचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती सुरेश सोमु राठोड (वय ४५ वर्षे रा. खामगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलिसांना दिली. घटनेनंतर जेसीबी चालक पळून गेला आहे. जेसीबी दत्तात्रय अनंता कुंभार (रा. वाखारी, ता. दौंड) यांच्या मालकीचा असून पोलिसांनी जेसीबी ताब्यात घेतला आहे. जेसीबी चालकाच्या चुकीमुळे बालिकेचा मृत्यू झाल्याने चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस हवालदार शशिकांत वाघ करीत आहेत.


Post a comment

 
Top