0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्य शासनाने मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये सुमारे 9 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा शोध घेण्यास मोठी मदत होत असून आतापर्यंत सुमारे 1100 हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यास त्यांची मदत झाली आहे.
सध्या मुंबई शहरामध्ये 1510 ठिकाणी 5000 सीसीटीव्ही कॅमेरे, पुणे शहरात 425 ठिकाणी एकूण 1234 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुणे शहरातील सीसीटीव्हीमुळे वाहतुकीचे नियम तोडल्या प्रकरणी सुमारे 14 लाख ई चलान फाडण्यात आले आहेत. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी फुटेजचा उपयोग झाला असून शहरातील एकूण 216 गुन्हे उघडकीस आले.मुंबईतील सीसीटीव्हीमुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या सात लाख जणांविरुद्ध ई चलान निर्गमित करण्यात आले. गुन्ह्यांच्या शोधासाठी 2100 फुटेजची मदत झाली. मुंबई शहरात आणखी 5625 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंबई व पुणे शहर मिळून एकूण 972 आरोपींना अटक करण्यात आली. नागपूर शहरामध्ये 3600 सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत.सीसीटीव्हीमुळे धार्मिक व सार्वजनिक उत्सव, मोर्चे, आंदोलने, अति महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, निवडणुका इत्यादी घटनांचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य झाले आहे.
गेल्या पाच वर्षात राज्य शासनाने कायदा व सुव्यवस्था योग्य प्रकारे राखली जावी, यासाठी विविध प्रकल्प राबविले आहेत. त्यामध्ये गुन्हा व गुन्हेगारी माग काढण्यासाठी नेटवर्क व यंत्रणा CCTNS (Crime and Criminal Tracking Network and System) हा प्रकल्प तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

Post a comment

 
Top