0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
           जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सर्व विभागप्रमुख, नोडल अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, रेल्वे, बँकाचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा निवडणूक अधिकारी राम म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घेण्याकरीता आचारसंहितेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी-व्हीजल या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सुविधा व सुचनांचेही प्रत्येकाने पालन करुन ही निवडणूक सर्वांनी एकत्रित मिळून शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.
           विधानसभा निवडणुकीची अंमलबजावणी करतांना आदर्श आचार संहितेचे उल्लघंन होणार नाही, याची काळजी घेवून आचार संहितेचे पालन करावे. तसेच निवडणूकीदरम्यान राजकीय पक्षांनी आपले प्रचार कार्य करतांना  प्रचाराच्या विविध माध्यमाचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करुन घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या सर्व खर्चाचे विवरण सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले
 राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल बँका, तसेच सहकारी बँका निवडणूक काळात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच आर्थिक व्यवहार होतील. यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की,  बँकांनी उमेदवारांची खाती प्राध्यान्यक्रमाने उघडून घेवून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराची माहिती महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांच्याकडे नोंदवावी. बँकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करतांना सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. यावेळी विविध विभागाचे प्रमुख, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, बँकाचे अधिकारी, नोडल अधिकारी, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.  

Post a comment

 
Top