0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ऑगस्ट अखेरपर्यंत 43 लाख 15 हजार रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
108 क्रमांक डायल केल्यानंतर अत्याधुनिक सोयी असलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जाते. राज्यात या सेवेच्या 937 रुग्णवाहिका आहेत. ऑगस्ट 2019 अखेरपर्यंत 3 लाख 49 हजार अपघातग्रस्तांना वेळेवर सेवा देऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. भाजणे, हृदयविकार, गरोदर महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात नेणे अशा विविध प्रकारच्या आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.मुंबई, पालघर, अमरावती, गडचिरोली आणि सोलापूर येथे बाईक ॲम्ब्युलन्स चालविण्यात येत आहे. मुंबईमध्ये 18, पालघर आणि अमरावती येथे प्रत्येकी पाच, गडचिरोली व पंढरपूर येथे प्रत्येकी  एक बाईक ॲम्ब्युलन्स चालविली जाते. मुंबईमध्ये दोन वर्षांत 14 हजार 600 रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळाला असून 30 बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आतापर्यंत 22 हजार 752 रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले.महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 26 लाख रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ झाला तर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून 21 लाख रुग्णांना मोफत उपचारासाठी मदत करण्यात आली. सर्वंकष आरोग्य सेवेबाबत नीती आयोगाने जाहीर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्राने देशात तिसरा क्रमांक मिळविला असून समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

Post a comment

 
Top