0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

गेल्या दहा दिवसांपासून घराघरामध्ये उत्साह निर्माण करणारा बाप्पा आज त्याच्या गावी जाणार आहे. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर तो परतीच्या प्रवासाला निघेल. बाप्पा जाणार यामुळे मनात भावना दाटून आलेल्या असल्या तरी विसर्जन मिरवणुकीचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय. गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी आहे. यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे. भक्तांकडून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष सुरू आहे.गणपती बाप्पा येणार म्हटलं की, सर्वांमध्ये उत्साह संचारतो. मग जोपर्यंत बाप्पा आपल्या घरात असतो तोपर्यंत सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. आज जड अंतकरणाने सर्व आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणपती उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो. या विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पालिका आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चोपाट्यांवर विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीनेही प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीत हाय अलर्ट आहे. यामुळे सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने मिरवणुकीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देताना वेगवेगळ्या टप्प्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे.

Post a comment

 
Top