BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘क’
प्रभाग क्षेत्राच्या हद्दीतील कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या जरीमरी नाल्यात एक
महिन्यापुवी पडलेले एक झाड महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याने अद्यापि नाल्यात
तसेच पडून असल्याचे दिसून येत आहे.
जरीमरी नाला हा कल्याण पश्चिमेतील मुख्य नाला असून याच नाल्याला कल्याण पूर्वेतून
येणारा नाला देखील रेल्वे स्टेशन जवळील सर्वोदय गृह संकुल येथे मिळतो पुढे तो पत्री
पुलाजवळून कल्याण खाडीला जाऊन मिळतो. साधारणत: एक महिन्यापूर्वी २७ जुलैच्या दरम्यान
झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी झुंझारराव मार्केट येथे या जरीमरी नाल्याकिनारी असलेले
एक झाड उन्मळून नाल्यात पडले. या घटनेला एक महिना उलटून गेला तरी हे झाड नाल्यात तसेच
पडून आहे. त्याच ठिकाणी लक्ष्मी भाजी मार्केटमधील भाजीपाल्याचा कचरा दररोज आणून नाल्यात
टाकला जात आहे. हा कचरा नाल्यात जमा होऊन त्या ठिकाणी मिनी डंपिंग ग्राउंड तयार झाल्याचे
चित्र आहे. या परिसरात साफसफाई करणाऱ्या महापालिकेच्या मुकादम वा सफाई कर्मचाऱ्यांचे
कुठलेच लक्ष नसल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे.
या परिसरातील एका दुकानदाराने एक महिन्याभरापासून सदरचे झाड नाल्यात पडून असल्याच्या
प्रकाराला दुजोरा दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे कर्मचारी व आरोग्य
निरीक्षक करतात तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे नाल्यात
टाकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याच्या कचऱ्याप्रकरणी महापालिका संबंधितांवर काही कारवाई
करणार आहे की नाही असा प्रश्न देखील कायम आहे. नालेसफाईवर दरवर्षी कोट्यावधी रुपये
खर्च केले जातात. हा खर्च टाळण्यासाठी मागे एका स्थायी समितीच्या बैठकीत सभापती दिपेश
म्हात्रे यांनी नाल्यात कचरा टाकला जाऊ नये यासाठी नाल्याभोवती उंच संरक्षक कुंपण उभारण्याची
कल्पना मांडली होती. त्या उपायाचे काय झाले असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत
आहे.
Post a comment