0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली  |
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ७०वा गणेशोत्यव साजरा करीत आहे. दरवर्षी विविध संस्कृतींचे दर्शन घडविणाऱ्या सजावटीसोबत विविध विषयांवरील प्रदर्शने मंडळ आयोजित करते. गेली दोन वर्षे डोंबिवली आणि परिसरातील नव-उद्योजकांसाठी एक संधी उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या वस्तू व सेवांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने मंडळाने स्टार्ट अप डोंबिवली या संकल्पने अंतर्गत प्रदर्शन भरविले होते. या दोन्ही वर्षी उद्योजकांचा तसेच ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
यंदाच्या वर्षी देखील मंडळाने स्टार्ट अप डोंबिवली या संकल्पने अंतर्गत प्रदर्शन आयोजित केले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा वेगळ्या विषयावरील काही स्टाॅल यामध्ये आहेत. त्यामध्ये फॅशन संबंधातील काही स्टाॅल, काही आधूनिक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंचे स्टाॅल तर काही खाद्यपदार्थांशी निगडीत स्टाॅल आहेत. एकूण १५ विविध प्रकारच्या उद्योजकांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. या व्यतिरीक्त ऊर्जा या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या स्टाॅलवर प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्यायी पिशव्या उपलब्ध आहेत तर विविसूडेहरा या संस्थेतर्फे परमविरचक्र मिळालेल्या जवानांच्या जीवनप्रवासावरील पुस्तकांचा स्टाॅल लावण्यात आला आहे. मनोदय चॅरीटेबल ट्रस्टतर्फे मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी बनविलेल्या काही गृहोपयोगी वस्तूंचा स्टाॅलदेखील आहे. दि. ८ सप्टेंबर २०१९ ते ११ सप्टेंबर २०१९ या कालावधीत दुपारी ४ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सुयोग मंगल कार्यालय येथे आयोजिण्यात आले आहे. सदर प्रदर्शनास विनामूल्य प्रवेश आहे.आज दि ८ सप्टेंबर २०१९ रोजी डेंबिवलीतील टिळकनगर, सावरकर रोड व शिवमार्केट या प्रभागाचे नगरसेवक सर्वश्री राजन आभाळे, संदिप पुराणिक व विश्वदिप पवार यांच्या हस्ते   प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मंडळाने नवोद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आयोजिलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे नगरसेवकांनी कौतुक केले तर मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तर मंडळाचे अध्यक्ष श्री सुशील भावे यांनी सर्व नगरसेवकांचे तसेच सहभागी उद्योजकांचे आभार मानले. प्रदर्शनाचे मुख्य प्रयोजक डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानले. त्यांनी दिलेल्या सढळ आर्थिक पाठबळामुळेच ह्या प्रदर्शनाचे आयोजन करणे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले. सदर प्रदर्शनाला अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण कार्यवाह केदार पाध्ये यांनी केले.

Post a comment

 
Top