0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल रात्री पुण्यात पोचली असता, टिळक रस्ता परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे यांना एका वाहनाची धडक बसून त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून आज त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे संचेती हॉस्पिटल चे डॉ. पुरम यांनी महामीडिया वॉचशी बोलताना सांगितले.
महाजनादेश यात्रा सायंकाळी हडपसरमध्ये पोचल्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक नेत्यांनी रस्त्यावर स्वागत कमानी आणि मंच उभारले होते. तसेच शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे सोलापूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना झाल्याने त्यांनी अनेक ठिकाणी स्वागत मंचाच्या ठिकाणी तिव्र नाराजी व्यक्त केली.
महाजनादेश यात्रा स्वारगेटला पोचल्यानंतर टिळक रस्ता परिसरात सुरू असताना कार्यकर्ते, नागरिक यांच्यात रेटारेटी झाली असता एका अज्ञात वाहनाची धडक अतिरिक्त आयुक्त तरवडे यांना बसली. त्यात त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी तरवडे यांना त्वरित संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डाव्या पायाला सिव्हिअर फ्रॅक्चर झाल्याने आजच शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना किमान 3 महिने विश्रांती घ्यावी लागेल अशी माहिती डॉ. पुरम यांनी दिली आहे.

Post a comment

 
Top