0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
यंदाच्या रक्षा बंधनाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा महिला मोर्चाने शक्ती सन्मान मोहोत्सवाचे आयोजन केले असून, याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या देण्यात येणार असून  कल्याण जिल्ह्यातून २१ हजारांहून अधिक राख्या पाठवणार असल्याची माहिती महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा उज्वला दुसाने यांनी दिली. यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा संयोजिका हेमा पवार, कल्याण पूर्वच्या सुमित्रा नायडू, कल्याण ग्रामीणच्या निर्मला मानकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. 
 राख्यांचे संकलन करण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सर्वस्तरातील व विविध क्षेत्रातील महिलांशी संपर्क साधणार असून महिलांना या उपक्रमाची माहिती आणि सरकारच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन त्यांच्या कडून मुख्यमंत्र्यांसाठी राखी व संदेशपर पत्र स्विकारणार आहेत. राखी व पत्र कार्यकर्त्यांकडे दिल्यावर ९२२७१९२२७१ या क्रमांकावर मिस कॉल देऊन या अभियानाशी महिला जोडल्या जातील. कल्याण जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त राख्यांचे संकलन करण्याचा संकल्प जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असल्याचे दुसाने यांनी सांगितले.

१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राखी संकलनाचे काम करणार असून १६ ऑगस्टला षण्मुखानंद सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकत्रितपणे राख्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास चारही विधानसभांच्या संयोजिका व सहसंयोजिका उपस्थित राहणार आहेत. ज्यांना प्रत्यक्ष राखी पाठवता येणार नाही त्यांनी rakhi2cm.com या वेबसाईटवर व्हर्चुअल राखी व संदेश पाठवावा असे आवाहन महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष उज्ज्वला दुसाने यांनी केले.

Post a comment

 
Top