0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पिंपरी चिंचवड व पुणे शहरातून गणेशोत्सव काळात कोकणात जाणा-या भाविकांनाही टोल फ्री पासेस मिळणार, अशी माहिती राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी प्रसिद्धीस दिली आहे. याबाबत ॲड. पटवर्धन यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणा-या वाहनांना टोल फ्री पासेस देण्याबाबत व वाहतूक व्यवस्थापन करण्याबाबत सामाजिक बांधकाम विभागाचे अवर सचिव रा. द. जोशी यांनी गुरुवारी (29 ऑगस्ट 2019) सुधारीत आदेश काढले. गणेशोत्सव काळात लाखो भाविक पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर व पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जात असतात. त्यांना टोल माफी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी विचारात घेऊन सामाजिक बांधकाम विभागाने टोल माफीचा आदेश काढला होता. परंतू त्या आदेशामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून जाणा-या वाहनांचा उल्लेख नव्हता. ही बाब पिंपरी चिंचवडमधील कोकण भागातील रहिवासी आणि सिंधूदूर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ॲड. पटवर्धन यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून पिंपरी चिंचवड व पुणे शहरातून कोकणात जाणा-या भाविकांना देखील टोलमाफी मिळावी अशी मागणी केली हेाती. त्यानंतर गुरुवारी (29 ऑगस्ट) प्रशासनाने सुधारीत आदेश काढून पिंपरी चिंचवड व पुणे शहरातून कोकणात जाणा-या भाविकांना दिलासा दिला आहे.
या आदेशात म्हटले आहे की, गणेशोत्सव काळात कोकणात जाणा-या वाहनांना टोल माफीबाबत फ्री पास देणे व वाहतूक व्यवस्थापन करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी या बैठकीत पोलिस महानिरीक्षक कोकण विभाग, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे संबंधित प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी कार्यवाही करावी, असेही आदेश दिले. या आदेशानुसार पुणे-मुंबई, पुणे ते कोल्हापूर-कागलमार्गे कोकणात जाणा-या, मुंबई (वाशी), पुणे मुंबई एक्सप्रेस-वे, किणी तासवडे येथील टोलनाक्यावरून पुढे जाणा-या गाड्या, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, पालघर, पुणे व पिंपरी चिंचवड जिल्ह्यातून कोकणात जाणा-या सर्व गणेश भक्तांना जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलिस ठाण्यातून वाहतूक विभागाच्या वतीने भाविकांच्या मागणीप्रमाणे टोल फ्री पासेस वाटप करण्यात येणार आहेत. टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या कालावधीत जास्तीचे मनुष्यबळ, एम.एस.एस. फोर्स, ट्रॅफिक वॉर्डन व हॅण्ड होल्डींग संबंधित मशीन ठेवण्यात येणार आहे. याबाबत सर्व संबंधित महामार्ग, प्राधिकारी, पथकर कंत्राटदार यांनी कार्यवाही करावी. तसेच सर्व शासकीय यंत्रणा, पोलिस व परिवहन विभागाने समन्वय साधून वाहतूक सुरळीत होण्याबाबत दक्षता घ्यावी. टोल माफी पास सुविधा व त्या उपलब्धततेची माहिती भाविकांना होण्याबाबत पोलिस व परिवहन विभागाने देखील पुढाकार घ्यावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे, अशीही माहिती ॲड. सचिन पटवर्धन यांनी प्रसिद्धीस दिली आहे. 

Post a comment

 
Top